आवडे उंचेगाव येथे तिन दिवसीय हार्टफुलनेस ध्यान शिबिर संपन्न
पैठण प्रतिनिधी
बबन उदावंत
आवडे उंचेगाव येथे तिन दिवसीय हार्टफुलनेस ध्यान शिबिर संपन्न
पैठण: आजादी का अमृत महोत्सवानिमित्त, ‘हर दिल ध्यान, हर दिन ध्यान’ या संकल्पनेनुसार हार्टफुलनेस संस्था, संस्कृती मंत्रालय भारत सरकार व श्री रामचंद्र मिशन यांच्या सहकार्याने लाखेफळ व आवडे उंचेगाव येथील ग्रामस्थांसाठी तीनदिवसीय तणावमुक्ती व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सध्याच्या ताण-तणावाच्या काळात मनुष्य एकमेकांपासून व स्वतःपासून दुरावलेला आहे. त्यामुळे शांती आणि स्थिरता निर्माण करण्याची खरी गरज आहे. या अनुषंगाने आवडे उंचेगाव लाखेफळ ग्रामस्थांसाठी दिनांक 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये ध्यानाची तीन सत्रे घेण्यात आली.
पहिल्या दिवशी हृदयावरील ध्यानाचे महत्त्व विशद करताना श्री. भागिनाथ चव्हाण, हार्टफुलनेस पैठण केंद्र समन्वयक म्हणाले की सध्याची जीवनशैली बघता ध्यानधारणा फार महत्त्वाची आहे. आपल्या संतपरंपरेने देखील ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे ध्यान धारणेमुळे मानसिक स्वास्थ्य तर ठिक राहते त्याचबरोबर प्रतिकारशक्ती देखील निर्माण होते.विद्यार्थ्यांनी नियमित ध्यान केल्यास त्यांच्या बुद्धिमत्ता कौशल्यामध्ये विकास होतो
व जीवनामध्ये संतुलन स्थापित होते. यावेळी सौ. लताताई अंबर तालुका समन्वयक यांनी तणावमुक्ती सह ध्यानाचा अनुभव दिला. दुसऱ्या दिवशी आंतरिक शुद्धीकरणाचे महत्त्व व अनुभव तर तिसर्या दिवशी प्रार्थनेसह ध्यानाचा अनुभव देण्यात आला.
या प्रसंगी महाराष्ट्राचे हार्टफुलनेस ग्रामीण विभागाचे समन्वयक श्री. शशिकांत घेर यांनी पैठण तालुक्यांमध्ये आझादी का अमृत महोत्सव निमित्त
15 ऑगस्ट 2023 पर्यंत 75 खेडेगावांमध्ये ध्यान शिबिर घेण्याचा मनोदय व्यक्त केला.
हार्टफुलनेस ही संस्था 160 देशांमध्ये कार्यरत असून प्राणाहुतीच्या माध्यमाने भक्तीला कृतीची जोड देण्याचे कार्य सातत्याने करीत असल्याचे सांगितले.
उपस्थित नागरिकांनी ध्यानामुळे स्वतःमध्ये स्थिरता निर्माण झाल्याचे तसेच तणावमुक्त होऊन परमानंद प्राप्तीचा अनुभव आल्याची भावना व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्राम विकास अधिकारी श्री. शिवराज गायके साहेब, ग्रामपंचायत सरपंच व इतर पदाधिकारी तसेच हार्टफुलनेस संस्थेचे भावनाताई पवार, जिजा भाऊ मिसाळ, आदित्य लहुगळे यांनी सहकार्य केले.